Translate भाषांतर सुविधा उपलब्ध

Saturday, February 20, 2010

आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.
(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक.

वाचक मित्रहो,

नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली ६-७ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते.

या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो.

माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत.

नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे वागतात हे रंजक आहे. असो.

नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो.

1. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?

बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित माझे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात.



माझे स्पष्टीकरण –

1. अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही.
2. दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे.
3. त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही.

२. प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही.

उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले.

माझे स्पष्टीकरण –

1. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्यापहायला त्यांचे हाताच्या आंगठ्याचे ठसे आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा भविष्य कथन करताना त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही.
2. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ?

प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते.

उत्तर – जर मला आपण चांगल्या दर्जाची फोटोची कॉपी पाठवली तर मी त्यात काय लिहिले आहे ते कळवीन. जर मला नाडीपट्टीचे ताडपत्र पाठवलेत तर त्याची कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन. पण तुम्ही ते पाठवण्याची तसदी घेतली नाहीत.

माझे स्पष्टीकरण -

1. श्री बी. प्रेमानंदांनी त्यांना स्वतःला तमिळभाषेतील मजकूर वाचायला येतो किंवा नाही ही बाब मुद्दामच गुलदस्तात ठेवली आहे. अर्थातच येत नाही. कारण त्यांना कूटतमिळ वाचायला आले असते तर तात्काळ लक्षात आले असते की जे भविष्य म्हणून सांगितले जात आहे, ते ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या युक्तीने मिळवून सांगितले जात नसून ते त्या पट्टीत खरोखरच कोरलेले आहे. हे मान्य करावे लागले असते. कधी क्वचित प्रसंगी वाचनाच्या वेळी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ही केला जातो. पायात सँडल घालून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत तसे झाले असण्याची शक्यता आहे.
2. श्री रिसबुडांनी त्यांना तो फोटो न पाठवण्यामागे कारण असावे. पुण्यात २९ सप्टेंबर १९९५ रोजी जो फोटो शो केला गेला त्याचे ते कारण असावे. त्या सभेत अंनिसचे १००हून जास्त सभासद हजर होते. त्यामधे वर्तमानपत्रातील आवाहन वाचून तीन तमिळ भाषा जाणणारे लोक उपस्थित होते. त्यांना तो फोटो दाखवण्यात आला तेंव्हा मीडियाच्या दोन कॅमेऱ्यासमोर (नंतर लेखी) त्यांनी जाहीर केले की त्या फोटोतील भाषा तमिळच आहे. जुनी लिपी असल्याकारणाने ती वाचायला सामान्यपणे अवघड आहे.
3. कोणतेही नाडी केंद्र आपल्याकडील नाडी पट्ट्यांची कार्बन कसोटी करायला देण्याच्या फंदात पडणार नाही कारण ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना सहकार्य कोण का म्हणून करील? मात्र विंग कमांडर ओकांसारख्या निस्पृह व सचोटीने वागणारऱ्यां शोधकांना प्राचीन महर्षींनी केलेल्या या लोकोत्तरसेवेचा शोध घेण्यासाठी आमच्यापैकी कितीतरी नाडीकेंद्रांनी त्यांना आपणहून फोटो काढायची नुसती परवानगी दिली नाही तर त्यांना फोटो उपलब्ध करून देण्याला तत्परतेने मदत केली आहे.
4. हे मात्र नक्कीच आश्चर्य आहे की बी. प्रेमानंदांसारख्या व्यक्तीने, ज्याने आपले सर्व आयुष्य पत्रिकेवरून किंवा अन्य मार्गांनी केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाला थोतांड म्हणून सिद्ध करण्याचा वसा घेतला आहे, त्यांनी जर-तरची भाषा वापरून, ‘मला जर कोणी नाडी पट्टीचे पान आयते आणून दिले तर मी माझ्या मर्जीच्या प्रयोगशाळेतून त्या पट्टीची तपासणीकरून त्या ताडपट्टीचे आयुष्य ठरविन’ अशी नुसती गर्जना करणे, त्यांना किंवा त्याच्या सारख्या विचारांच्या व्यक्तींना व संस्थांना किती लांछनास्पद आहे? अशांना आपणहून शोधकाम करायला कोणी अडवले आहे ? जर ते आमच्या केंद्रात नाडी महर्षींच्याकडे श्रद्धाभावाने नाडी भविष्याचे रहस्य जाणून घ्यायला आले तर आम्ही त्यांना नक्कीच योग्य ती मदत करू. पण नाडी वाचकांची व पर्यायाने नाडी महर्षींची मस्करी करायला आलात तर मात्र आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही.

प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे. हे मात्र नक्की की नाडी पट्ट्यात ऋषींचे उल्लेख येतात.

उत्तर – ओरिजिनल किंवा अस्सल ताडपट्टया असतात हे मानणेच मुळात चुकीचे आहे. त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात. पण त्या प्राचीन दिसाव्यात यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. तथापि त्या पट्यांचे आयुष्य मात्र शोधता येईल. त्यावरून नाडी पट्टयांचा खोटेपणा सिद्ध करता येईल.

माझी प्रतिक्रिया –

1. या ठिकाणी नोंद करायला हवी की जर्मनीतील एका थॉमस रिटर नावाच्या व्यक्तीने भारतातून एक नाडी पट्टी मिळवून त्याची कार्बन १४ कसोटी त्यांच्या देशातील अत्यंत प्रगत अशा प्रयोग शाळेत केली आहे. शिवाय त्यांनी त्या नाडी पट्टीतील मजकुराची जर्मनीतील तमिळभाषा तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे करवून घेतली आहे. त्यात त्या तज्ज्ञांनी असे म्हटले की पट्टीतील मजकूर कोणत्या तरी धार्मिक ग्रंथांचा किंवा पौराणिक कथांचा नसून खरोखरच कोणा एकाचे भविष्यकथन आहे. कार्बन कसोटीच्या निर्णयात असे म्हटले गेले की ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी. जर एका परदेशी व्यक्तीला कार्बन कसोटी करता येत असेल तर आम्हा भारतीयांना ती करायला कोणी आडवले आहे?
2. विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या. त्यामुळे असे शक्य आहे की ताडपट्टयावरीन मजकूर प्राचीन असावा मात्र त्यामानाने ताडपट्ट्या ३०० वर्षांच्या आसपासच्या जुन्या असाव्यात. हे म्हणणे जर्मनीतील कार्बन १४ कसोटीच्या शोधकार्याच्या उपपत्तीवरून ही सिद्ध होते.

प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही.

उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख)

ती अशी -

1. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली.
2. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते.
3. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते.

माझी प्रतिक्रिया –

1. मी आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची नाडीपट्टी स्त्रियांच्या डाव्या व पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून शोधली जाते. पत्रिका वा कुंडलीवरून नाही. श्री. प्रेमानंदांनी अंगठ्याच्या ठशांचा पुसटसा देखील उल्लेख आपल्या लेखात केलेला नाही. हे कसे काय? खरे तर त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तीने या बाबत खुप ढोल पिटायला हवे होते, कि अंगठ्यांच्या ठशांच्यावरून भविष्य कथन करतो असे म्हणणे म्हणजे निव्वळ देखावा असावा. आदि.

1. त्यांचे हे कथन की तो नाडीवाचक आत गेला व त्याने आतून आणलेल्या एका ताडपट्टीतून त्यांचे भविष्यकथन करण्यात आले. त्यात त्यांचा भूतकाळ १०० टक्के बरोबर आला. यात काही गफलत आहे. कारण सर्व नाडी पट्टयांना असलेल्या भोकातून दोरी माळेप्रमाणे ओवून बंद केलेल्या असतात. अशा ताडपट्ट्या दोन लाकडी बॅटन सारख्या पट्ट्यांच्यामधे घट्ट बंद करुन वर उरलेल्या दोरीने ते पॅकेट जाम गच्च बांधून टाकले जाते. जेंव्हा केंव्हा नाडी पट्टीत आपली पट्टी सापडली असे ग्राहक म्हणतो तेंव्हा ती पट्टी त्या ओवून बांधलेल्या पॅकेटमधलीच असते. त्त्यामुळे श्री. प्रेमानंद कोणत्या नाडीकेंद्रात गेले होते याबद्दल प्रश्न पडतो. अशी एक सुटी नाडीपट्टी आतल्या खोलीतून आणून जर भविष्यकथन केले जात होते तर त्याच वेळी त्यांनी वाचकाला व केंद्र प्रमुखाला तशी विचारणा का केली नाही? आश्चर्य असे की त्यांच्यासारखा प्रत्येकाचा खोटारडेपणे उघडे पाडण्याच्या कलेत तज्ञ, शिवाय जो स्वतः कुंडल्यांची अदलाबदल करण्याची हातचलाखी करतो त्यालाही नाडी वाचकांच्या खोटेपणाला उघड करता आले नाही ? ‘असे असेल-तसे असेल’ असे शुष्क तर्क करण्यापलिकडे ते गप्प बसतातच कसे? आणि त्या नाडी वाचकाने केलेल्या ‘भविष्यकथनात १०० टक्के सत्य सांगण्यात आले’ या भुलावणीला बळी कसे पडलो असे सांगतातच कसा व का? पुन्हा पुन्हा नाडी केंद्रांना स्वतः वा आपले तरबेज चेले पाठवून नाडी केंद्रांचा खोटेपणाचा धंदा आजही चालवू का देतो?
2. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यांतिक कल्पनाविलास आहेत. नाडी केंद्राचे लोक बाहेर बसवून त्यांच्यामार्फत व नाडी वाचकाने चतुराईने प्रश्न विचारून मिळवलेल्या माहितीवरून केंद्रातल्या एका खोलीत बसून गुप्ततेने ताडपट्ट्यावर लिखाण करून काहीतरी कारण काढून नाडीवाचकाच्या हाती गुपचुप पोचवल्या जातात हे म्हणणे इतके हास्यास्पद आहे की त्यांच्या सारख्या आंतरराष्टीय दर्जाच्या कृतीशील बुद्धिवाद्याला ते शोभत नाही. अशी फालतू कारणे दाखवून नाडी केंद्रवाचकांना ताडपट्ट्यात कूटलिपित त्वरित लेखनाची कला अवगत असल्याचा मान देऊन त्यांचा भाव मात्र त्यांनी उगीचच वाढवला आहे.
3. नाडीकेंद्रातील वाचक फक्त नाडीपट्टयातील मजकूर वाचू शकतात. त्यांना तो मजकूर कोरुन लिहिता येत नाही असे ते स्वतः प्रांजळपणे वेळोवेळी कबूल करतात. पण श्री. प्रेमानंदांसारखे लोक आपले तर्क खरे आहेत असे भासवण्याकरता त्यांना जबरदस्तीने ताडपट्ट्यात कोरून लेखनकरण्याच्या कार्यातील तज्ञ मानतात! श्री. प्रेमानंदांना ते ताडपट्टया लिहित असतात असे जर वाटत होते तर त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे?
4. या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो. त्या खोलीत गुप्तपणे लिखाण वगैरे काहीही चालत नाही. पुण्यासारख्या शहरात गेली १०-१२ वर्षे नाडी केंद्रचालवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिचे जबाबदारीपुर्वक हे लेखन आहे याचे भान ठेऊन मी जे सांगतो त्याचे महत्व वाचकांनी जाणावे. कोणत्याच नाडीकेंद्रातून असे लपवून नव्या ताडपट्ट्या तयार करण्याचे काम केले जात नाही.
5. नाडीपट्यांची पॅकेट्स नीट व्यवस्थित एकावर एक लावून ठेवलेली असतात. नाडी वाचक कधी कधी बसून तर बहुतेक वेळा उभ्याने त्या पट्ट्याच्या पॅकेट्स मधून योग्य त्या अंगठ्याच्या ठशाच्या समुहाच्या पट्ट्यांचे पॅकेट शोधत राहतो. तमिळनाडूच्या बाहेर चालू असलेल्या नाडीकेंद्रात एकावेळी नाडी पट्यांची सीमित पॅकेट्स मागवली जातात. त्या अनेकदा सुटकेसेसमधे ठेवलेल्या असतात. या व्यतिरिक्त काही पाने झाडावरून उतरवलेल्या झावळ्या, पैकी काही एक सारख्या कापून तयार ठेवलेल्या, मजकूर न लिहिलेल्या वा काही जागा मजकूर लिहायला मोकळा ठेवलेल्या, अशा ताडपट्ट्या जर नाडीकेंद्रात ग्राहकाच्या मिळवलेल्या माहितीस तात्काळ लिहायला ठेवलेल्या असाव्या लागतील पण तशा त्या नसतात. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया (म्हणजे नेमके काय?) करण्याचा प्रश्नच येत नाही.
6. नाडी भविष्य पहायला आलेल्यात केंद्रातील आपल्या माणसे बसवायची शक्कल तमिळनाडू राज्यात कदाचित अमलात आणणे शक्य होईल.(तशी ती केली जात नाही तो भाग वेगळा) मात्र युक्तीने एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या नकळत त्याच्यी व त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी-पतीचे नावे, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, संततीची संख्या, जन्मदिवस आदि माहिती अत्यंत कमी वेळात काढण्यासाठी असामान्य वाकपटुत्व व तमिळभाषेवर प्रभुत्व असावे लागेल. त्याशिवाय अशी मिळवलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेऊन ती एका ताडपत्रावर कोरून तयार करायची आदि तर्क करायला सोपे पण अमलात आणायला अशक्य आहेत. माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे. कारण तमिळेतर भागात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तेथे बाहेर बसलेल्या ग्राहकांची भाषा नाडीकेंद्रातील लोकांना येत नाही. नाडीवाचकांच्या संकोची स्वभावामुळे व भाषेच्या दुराव्यामुळे अनेक वेळा तोडक्यामोडक्या संभाषणांतून गैरसमज निर्माण होतात. या उप्पर कोणा नाडीकेंद्रातील माणसाने ग्राहकांशी घोळात घ्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या भाषेच्या-बोलण्याच्या धाटणीवरून व सामान्यतः रंगावरून तो केंद्राचा माणूस म्हणून तात्काळ पकडला जाईल.
7. या शिवाय हे ही लक्षात ठेवले पाहिजे की नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती इतका मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो की परक्याला आपली माहिती तो आपणहून देईल. खरे तर नाडी भविष्य प्रथम पहायला गेलेला प्रत्येकजण नाडीकेंद्राच्या व ते पहायला आलेल्या अन्य लोकांकडे साशंकतेने व सावधानतेने इतरांकडे पहात असतो. या शिवाय आम्ही, नाडीकेंद्रातील कर्मचारी, अंगठ्याचा ठसा घेताना ग्राहकांना सावध करतो की पट्टी शोधायची पद्धती काय असते व त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही यातच उत्तरे द्या. आपणहून माहिती आम्हाला किंवा इथे जमलेल्या कोणाला देऊ नका.
8. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्या अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा बोलणारी माणसे मिळत नाहीत. भविष्य कथन टेप करून देताना भाषांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते.
9. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील.
10. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यंच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात.
11. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाली आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
12. या इथे मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की जर कोणाला नाडी ग्रंथांचा अभ्यास करायची इच्छा असेल तर अशा अभ्यासकार्याला मी आनंदाने तयार आहे. मात्र ते अभ्यास कार्य पुर्वग्रहदूषित नसलेल्या श्रेष्ठ व नामवंत शास्त्रज्ञांच्या मंडळाच्या निर्देशनाखाली एकत्र येऊन करावे. त्यात नाडी ग्रंथ भविष्याला थोतांड असा शिक्का मारून खोटे ठरवणाऱ्या संस्था वा व्यक्तींचा समावेश नसावा.

(श्री. जी. ईश्वरन यांचे विचार - विंग कमांडर शशिकांत ओकांचा शब्दांकन)

No comments: